वाशिम : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर शहराभोवती संपूर्ण रिंग रोड उभारण्याची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली आहे. यासाठी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय उत्तमराव देशमुख यांनी नवी दिल्लीत गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

वाशिम : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर शहराभोवती संपूर्ण रिंग रोड उभारण्याची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली आहे. यासाठी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय उत्तमराव देशमुख यांनी नवी दिल्लीत गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
वाशिम शहरातून सध्या अकोला, हिंगोली, मंगरूळपीर आणि पुसद या प्रमुख मार्गांची वाहतूक होते. शहरासाठी एनएच-161 (अकोला–हिंगोली मार्ग) वर बायपास असला तरी इतर दिशांनी येणारी वाहतूक अद्याप शहरातूनच जाते. त्यामुळे शहरात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तावित रिंग रोड एनएच-161 (अकोला दिशेकडून) सुरू होऊन पुढे एनएच-161ई तसेच राज्य महामार्ग 183 (मंगरूळपीर–पुसद मार्ग) यांना जोडत पुन्हा एनएच-161 (हिंगोली दिशेकडे) जोडण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. हा रिंग रोड विकसित झाल्यास शहराभोवती संपूर्ण वाहतूक वळवणे शक्य होणार असून शहरातील ट्रॅफिक जामची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत होईल, तसेच अकोला, हिंगोली, पुसद व मंगरूळपीर या भागांमधील प्रवास अधिक सुरक्षित व जलद होईल, असा विश्वास खासदार संजय देशमुख यांनी व्यक्त केला.
दिग्रससाठी बायपास, सीआरएफ अंतर्गत रस्त्यांची मागणी
याच भेटीदरम्यान खासदार देशमुख यांनी दिग्रस शहरासाठी बायपास उभारण्याची मागणीही गडकरी यांच्याकडे केली. मानोरा बायपासपासून दारव्हा रोडला जोडणारा एनएच-161ए ते एनएच-361सी दरम्यान बायपास मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. या मार्गासाठी ब्रिटिशकालीन रेल्वेची उपलब्ध जमीन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जमीन अधिग्रहणाची गरज भासणार नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या रस्त्यांच्या विकासासाठी सेन्ट्रल रोड फंड अंतर्गत प्रस्तावही सादर करण्यात आले आहेत. या रस्त्यांना मंजुरी मिळाल्यास ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे
