गॅस बुकिंग होईना, सर्व्हरही डाऊन; गॅससाठी ग्राहकांची तारांबळ : दररोज लागतात ४ हजारांहून अधिक घरगुती सिलेंडर; एजन्सीवर ग्राहकांच्या रांगा

वाशिम : जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बुकिंग नंबरवर प्रतिसाद मिळत नसल्याने तसेच ऑनलाइन प्रणाली व सर्व्हर व्यवस्थित कार्यरत नसल्यामुळे ग्राहकांना गॅस एजन्सीवर जाऊन बुकिंग करण्याची वेळ आली आहे. परिणामी अनेक ठिकाणी एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

वाशिम : जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बुकिंग नंबरवर प्रतिसाद मिळत नसल्याने तसेच ऑनलाइन प्रणाली व सर्व्हर व्यवस्थित कार्यरत नसल्यामुळे ग्राहकांना गॅस एजन्सीवर जाऊन बुकिंग करण्याची वेळ आली आहे. परिणामी अनेक ठिकाणी एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या तीन प्रमुख कंपन्यांच्या एकूण १८ गॅस एजन्सी कार्यरत आहेत. या एजन्सींमार्फत दररोज सरासरी ४ हजार २०३ घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण केले जाते. जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र सध्या तांत्रिक अडचणींमुळे गॅस बुकिंग होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. बुकिंग नंबरवर प्रतिसाद मिळत नसल्याने तसेच व्हॉट्सअॅपवरून बुकिंग प्रक्रियेलाही विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे संभाव्य अडचणी लक्षात घेऊन अनेक ग्राहक गॅस सिलेंडर आधीच भरून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण तात्पुरते थांबवून केवळ घरगुती सिलेंडरचेच वाटप सुरू ठेवण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.अनेक प्रयत्नांनंतर गॅस सिलेंडरचे बुकिंग झाल्यानंतरही ग्राहकांना तात्काळ डिलिव्हरी मिळत नसल्याचे चित्र आहे. सध्या बुकिंग झाल्यानंतर संबंधित ग्राहकांना दोन ते तीन दिवसांनी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी दिली जात असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत : ब्रिजेश पाटील

युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा भासणार नसून पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांनी दिली आहे.भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या तिन्ही प्रमुख कंपन्यांकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जिल्हा प्रशासन आणि तेल कंपन्या जिल्ह्यात इंधनाचा साठा कायम राखण्यासाठी समन्वयाने काम करीत आहेत. त्यामुळे इंधन तुटवड्याबाबत पसरत असलेल्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये तसेच पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धजन्य परिस्थिती असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने इंधन पुरवठ्याचा आढावा घेतला असून सध्याची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »