जीडीडीपी वाढीत बुलढाणा नंबर वन; वाशिम दुसऱ्या क्रमांकावर; जिल्ह्याची आर्थिक प्रगतीची दमदार झेप

वाशिम : महाराष्ट्रातील जिल्हानिहाय नाममात्र सकल जिल्हा देशांतर्गत उत्पादन (जीडीडीपी) वाढ दराच्या आकडेवारीनुसार सन २०२४–२५ या आर्थिक वर्षात बुलढाणा जिल्ह्याने २२.६ टक्के वाढीसह राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असून वाशिम जिल्ह्याने २१.० टक्के वाढ नोंदवत दुसरे स्थान पटकावले आहे.

वाशिम : महाराष्ट्रातील जिल्हानिहाय नाममात्र सकल जिल्हा देशांतर्गत उत्पादन (जीडीडीपी) वाढ दराच्या आकडेवारीनुसार सन २०२४–२५ या आर्थिक वर्षात बुलढाणा जिल्ह्याने २२.६ टक्के वाढीसह राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असून वाशिम जिल्ह्याने २१.० टक्के वाढ नोंदवत दुसरे स्थान पटकावले आहे. ही वाढ राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक असल्याचे दिसून आले आहे.  

 याशिवाय नाशिक जिल्हा १८.२ टक्के, हिंगोली जिल्हा १७.९ टक्के आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा १६.८ टक्के वाढीसह आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर बुलढाणा, वाशिम जिल्ह्याने साधलेली आर्थिक झेप विशेष महत्त्वाची मानली जात आहे. जिल्ह्यातील कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील सातत्यपूर्ण प्रगतीमुळे ही वाढ शक्य झाली असल्याचे मानले जात आहे. कृषी उत्पादनात झालेली वाढ, सेवा क्षेत्रात निर्माण होत असलेल्या नव्या संधी आणि उद्योग क्षेत्राला मिळणारे प्रोत्साहन यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) प्रोत्साहन देण्यासाठी विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून उद्योजकांना मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य तसेच उद्योग उभारणीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम स्थानिक उद्योगवाढ आणि रोजगारनिर्मितीवर होत असल्याचे दिसून येत आहे.  याशिवाय जिल्हा प्रशासन, जिल्हा उद्योग केंद्र आणि संबंधित विभागांच्या माध्यमातून उद्योगवाढ, गुंतवणूक वाढविणे आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. नवीन उद्योगांना प्रोत्साहन देणे, उद्योजकांना आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे तसेच उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावरही प्रशासनाचे लक्ष केंद्रित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »