वाशिम : जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्ध गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत सराईत दुकानफोड्या आरोपीला अटक केली असून दोन गुन्ह्यांची उकल केली आहे.

वाशिम : जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्ध गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत सराईत दुकानफोड्या आरोपीला अटक केली असून दोन गुन्ह्यांची उकल केली आहे.
१९ फेब्रुवारी रोजी सिव्हील लाईन परिसरातील मातोश्री झेरॉक्स दुकान फोडून काउंटरमधील ९,५०० रुपये चोरी करण्यात आले होते. तसेच २० फेब्रुवारीच्या रात्री सोनखास रोड, लाखाळा येथील माऊली किराणा दुकान फोडून सुमारे ५० हजार रुपये चोरी करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीकॅमेरा फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे संजय बबन खाडे (वय ३०, रा. करंजी, ता. मालेगाव, जि. वाशिम) याने हे गुन्हे केल्याचे निष्पन्न केले. आरोपी फिरस्ती असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हानात्मक होते. मात्र अथक परिश्रमानंतर २८ फेब्रुवारी रोजी त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली असून चोरीची रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या पथकाने केली. पथकात उपनिरीक्षक योगेश धोत्रे, गजानन हागरे, ज्ञानदेव मात्रे, अमोल इरतकर, सुनिल तायडे यांचा समावेश होता.
